ती समोरची खिडकी….
भाग ०१
अर्णव मोबाईलमध्ये ब्लॉग वाचत बसलेला. आज रविवारमुळे नोकरीला सुट्टी होती त्याला. अश्लेषा केस पुसत बाहेरच्या खोलीत आली.
अश्लेषा : आवरा तुमच. माझ झाल कि जाऊ आपण.अर्णव तिला बघतो. ती त्याला बघते.
अश्लेषा : काय ?अर्णव : काही नाही.अश्लेषा : नक्की न ?
अर्णव : हो.ती आरशाकडे तोंड आणि अर्णवकडे पाठ करून केस पुसत होती. अर्णव तिच्या एकसारख्या हालचालीला बघत होता. मोबाईल बाजूला ठेवत तो तिच्या जवळ गेला. आणि आरशातून तिच्याकडे बघत,अर्णव : अस म्हणतात लग्नानंतर सहा महिने, वर्षभरच सगळ सुंदर वाटत. तो तिला. ती त्याला. आपल्या लग्नाला आता दोन वर्ष होतील. तरी मला तू अजून सुंदर वाटतेस. आणि पुढे अजून तीस-चाळीस वर्ष वाटशील.अश्लेषा : खरच ?अर्णव : हो. या सुंदर डोळ्यात मी मला दिसतो ना खर सांगू खूप भारी दिसतो मी. या ओठांच्या चवीवर तुझ्या कायम मी फिदा आहे. तुझ्या या मऊ हाताच्या स्पर्शाने मी कायम मला नाजूक समजत राहतो. या सुंदर चेहऱ्यावर सोडलेले मोकळे केस, ऊफची आठवण करून देतात. माझ्या आयुष्यातल्या तुझ्या प्रेमाचा कैफ, कधी विरस नाही होणार आणि होऊ नये असच वाटत. हा कैफ कैक वर्ष असाच टिकवून मला त्यात रमून जायचं आहे.अश्लेषा मागे फिरून अर्णवकडे बघते.
अर्णव तिला बघतो. तिला जवळ घेतो. दोघ शांत श्वास घेत एकमेकांच्या मिठीत उभे असतात. ती मिठीतून निघून आत जाते. अर्णव आरशात बघून परफ्युम शर्टवर मारतो. केसातून जरासा हात फिरवल्यासारख करतो. ती थोड्यावेळात आतल्या खोलीतून आवरून येते. दोघ गाडीत बसतात.गाडी एका दवाखान्यासमोर थांबते. दोघे आत जातात. डॉक्टर अश्लेषाला तपासून तिला काही गोळ्या देतात. दोघे पुन्हा गाडीत बसून पुढे निघून जातात.अर्णव : काय त्रास होतोय का ?अश्लेषा : नाही मळमळतय जरास.अर्णव : काय खायचं आहे का ?
अश्लेषा : नको. कस तरी होतय. मी ती गोळी खाते डॉक्टरांनी दिलेली पित्ताची.तिने पित्ताची गोड गोळी तोंडात ठेवली.अर्णव : आनंद पण होतोय पण वाईट पण वाटत तुझा त्रास बघून.अश्लेषा : असुदे. त्रासाशिवाय आनंद नाही. आपल बाळ आल कि सगळ विसरून पण जाईन मी हा त्रास.
अर्णव : पण तोपर्यंत त्रास होणारच ना.अश्लेषा : असुदे.तिने त्याच्या हाताला धरल. त्याने हि तिच्या हाताला घट्ट पकडल.दोघे एका अपार्टमेंटच्या जवळ पोचले.अर्णव नारायण राव नावाच्या एका माणसाला कॉल करतो.अर्णव : आम्ही आलोय इथे डायमंड अपार्टमेंटपाशी.नारायण : आलात का तुम्ही. मी शेजारच्याच सोसायटीमध्ये आहे. आलोच. मला एक दहा मिनिट द्या.
आलोच. तुम्ही कसे आलायत ?
अर्णव : चारचाकी आहे.
नारायण : हा मग ठीक आहे. आलोच.अर्णव : हो.
अर्णव आणि अश्लेषा दोघ नारायण रावची वाट बघत थांबतात.
भाग ०२
बारा मिनिट वाट बघत थांबून दोघांना कंटाळा आला. गाडी तापल्यामुळे दोघांना गरम होत होत. त्याने ए.सी. लावला. नारायण तिथे आले. गाडीच्या काचेला त्यांनी हाताने थाप दिली. अर्णव गाडीची काच खाली करतो.
नारायण : अर्णव ?
अर्णव : हो.
नारायण : चला.अर्णव आणि अश्लेषा गाडीच्या बाहेर येऊन नारायणच्या मागे चालत असतात.
नारायण : तुमच्या घरापासून किती वेळ लागला इथे यायला ?
अर्णव : अर्धातास लागला.
नारायण : तरी तुमच्या घरापासून इकडे यायला माझ्यामते रहदारी सहसा नसते.
अर्णव : हो. म्हणून तर लवकर पोचलो. नाहीतर इकडच्या बाजूला रविवारी वैगरे आलो ना दुसऱ्या रस्त्याने तर एक-सव्वा एक तास जातो.तिघे लिफ्टमधून बाराव्या मजल्यावर गेले.
नारायण : सोसायटी असल्यामुळे इथे सगळ्या अपार्टमेंटस जवळ जवळ आहेत. पण तुम्हाला ज्या दाखवणार आहे ना रूम्स तिथे सगळीकडून प्रायव्हसी आहे. तुम्ही बघाल तर म्हणाल ह्याच रूम्स बेस्ट आहेत.अर्णव : बर.
नारायण : चला सर.तिघे लिफ्टमधून बाहेर आले. नारायण हातातल्या चावीने कुलूप उघडतात. सरळ दोघांना आत जाऊन मोठी बेडरूम दाखवतात. आतल्या बाल्कनीतून दिसणार नजरेच्या रेषेतल शहर आनंदाने दाखवतात. मग किचनमध्ये येऊन किचन मधला उजेड आणि खिडकीतून येणारी खेळती हवा याची सगळी माहीती सांगत किचन ट्रोली, वाटर प्युरीफायर मशीनची माहिती, बाजूला असलेल्या बाथरूम, त्यात असलेल गिझर वैगरे दाखवून बाहेरच्या हॉलमध्ये येतात.नारायण : साहेब, आवडल्या का रूम्स ? कार्पेट एरिया धरून साडेसातशे स्क्वेअर फुट आहे. पण त्याहून मोठा वाटतो. हो न ?अर्णव : हो मोठी आहे जागा.अर्णव खिडकी जवळ गेला आणि त्याने आधीचा जो पडदा होता तो बाजूला सारला आणि त्याने समोर नजर टाकली.नारायण : पाण्याची इथ कमतरता नाही. दोन बोअर मारलेत खाली त्यामुळे पाणी चोवीस तास असत. लाईटपण कधीच जात नाही इथे. वर दोन पवनचक्क्या आहेत. लाईट गेली तर त्याची लाईट सुरु होते. आजूबाजूला आपल्या तोलामोलाची लोक राहतात. कुणी कुणाच्यात जात नाही. कुणी कुणाशी वाद घालत नाही. एकदम सुकून आहे इथे. रात्री गाड्यांचा आवाज फारसा येत नाही कारण आतल्या बाजूला आहे अपार्टमेंट. सगळ कस तुम्हाला हव तस आहे पण कस आहे ना, सगळच आपल्याला हव अस मिळत नाही. म्हणून इथे हि एक गोष्ट जरा तुम्हाला पाळावी लागेल.अश्लेषा : काय ?नारायण : हि खिडकी सहसा उघडी ठेवू नका.अर्णव : का ?नारायण : समोर एक जोडप राहत. त्यांचे वाद होत असतात रोज. आणि कधी कधी तो माणूस त्याच्या बायकोला हाणमार पण करतो. आधीचे होते त्यांनी सांगितल कि कधी कधी ते सगळ्या खिडक्या उघड्या ठेवून सेक्स पण करतात. इथे आधी राहायचे त्यांचा पाचवीतला मुलगा होता त्याने दोनदा त्यांना त्या अवस्थेत बघितल म्हणून तर त्यांनी ह्या रूम्स सोडल्या. आता तुमच्यात लहान कुणी नाही. त्यामुळे काय टेन्शन नाही पण तरी काळजी घेतली तर तुम्हाला त्रास होणार नाही.
अर्णव : बाकीच्यांना त्यांचा त्रास होत नाही का ?
नारायण : याच रूम्सना फक्त त्यांची खिडकी आणि त्यांच्या घरातल स्पष्ट दिसत बाकीच्यांच्या खिडक्या या वेगळ्या दिशेला आहेत.
अर्णव : रूम्स चांगल्या आहेत. ती समोरची खिडकी. ती सोडली तर सगळ चांगल आहे. आगाऊ भाड किती द्यायचं तुम्हाला ?
नारायण : आगाऊ अस नाही या महीन्याच बारा हजार भाड आणि माझे आठ हजार कमिशनचे.
अर्णव : उद्या देतो.
नारायण : चालेल.
अर्णव : अश्लेषा निघायचं ?
अश्लेषा : हो.
तिघे पुन्हा दार बंद करून लिफ्टने खाली आले. नारायण निघून गेला अर्णव आणि अश्लेषा घरी निघून आले.
भाग ०३
घरी…अश्लेषा बेडवर उशीला टेकून बसलेली. खालच्या बाजूला अर्णव त्याच्या शर्टला इस्त्री करत होता.
अश्लेषा : काय आजकाल चाललय लोकांच. खरच अवघड आहे.अर्णव : काय झाल ?
अश्लेषा : अरे कॉलेजमध्ये शिकणारी पोर घरातून विरोध होईल त्यांच्या प्रेमाला म्हणून आत्महत्या केली त्यांनी. असल कसल हे प्रेम. केल तर ते निभवायचं ना. हे अस अर्धवट आयुष्य जगून प्रेमाला पूर्णत्व मिळत का कुठे. आणि हे अस जीव देऊन कुणाच प्रेम सिध्द होत ?
अर्णव : पण हेच तर खर प्रेम आहे ना.अश्लेषा : कस काय ?
अर्णव : सोबत राहणारे कितीपत खर प्रेम करतात आजकाल एकमेकांवर ? देवळातला देव दगडाच्या पायात तिथच अडकून राहतो. भले त्याच पावित्र्य तिथ टिकून नसेल पण माणसाला वाटत आपल्यासाठी तो देव पावतोय. आणि देव वाट बघत असतो त्या मूर्तीतून बाहेर पडण्यासाठी मिळणाऱ्या योग्य कारणाची. आहे जिवंत म्हणून देवाला मानायचं आणि माणूस करतोय सेवा म्हणून देवाने माणसाला पावायचं असच नात आहे. आणि तसच माणसा-माणसात सध्या सुरु आहे. कित्येक नवरा बायको फक्त नावाला नवरा बायको आहेत. बायकोच मन कुणात अडकलेल असत. नवरा कुणाच्या तरी मागावर असतो. घरी मात्र दोघ असेच असतात दोन्हीकडे दोन तोंड करून. आणि जगासमोर उत्तम जोडी बनून वावरत असतात. सगळ खोट. काल्पनिक असत. अशात कुणी कुणावर प्रेम करत आणि विश्वासाने एकमेकांसाठी जीव देत खरच प्रेम आहे ना ते. जिवावरच्या शरीरावर प्रेम करणाऱ्या पिढीत कुणी अस जीवावर प्रेम करणार असेल तर त्यांच्यासारख नशिबी कोण नाही. पण म्हणून जीवावरच प्रेम जीवाशी खेळून सिध्द करण चुकीच आहे. आणि त्यांना वाटल होत फक्त कि त्यांचे आई वडील परवानगी देणार नाहीत त्यांच्या प्रेमाला…… पण काय माहित दिली असती तर ? किंवा यांनी पण प्रयत्न करायला हवे होते ना परवानगी मिळवायला ?अश्लेषा : बघ ना. अवघड आहे. सगळ.
अर्णव : पण एक गोष्ट आपण म्हणतो कि आजकाल जगातून खर प्रेम संपत चाललय. पण रोज पेपरमध्ये अशा प्रेमासाठी जीव देणार्यांच्या किमान एक दोन तरी बातम्या असतातच. दिवसाला एक म्हंटल तर वर्षाला तीनशे पासष्ठ. आणि अशी गणती केली तर एक दिवस सातशे करोड आजची लोकसंख्या आहे इतकी संख्या फक्त खर प्रेम करणाऱ्यांचीच असेल.
अश्लेषा : होना. कसल भारी ना ?
अर्णव : हो. आपल पण प्रेम आहे खर पण ते सिध्द करायची गरज नाही.
अश्लेषा : हो.
अर्णव : आय लव्ह यु बायको.
अश्लेषा : आय लव्ह यु हबुडी.अर्णव : तुझ्या त्या ड्रेसला इस्त्री करायचीय ना ?
अश्लेषा : मी करते नंतर.
अर्णव : आता इस्त्री आहे गरम तर करतो ना. कुठय सांग ड्रेस ?
अश्लेषा : आत कपाटातच आहे. काळा.अर्णव जाऊन ड्रेस आणतो आणि इस्त्री करायला लागतो.
अर्णव : तुला खरच आवडल्या का त्या रूम्स ?
अश्लेषा : हो खूप. तू नसलास कधी तर बेडरूमच्या बाल्कनीतून बघत बसेन नजरा. किती मस्त दिसत ना सगळ शहर तिथून. आपली आरामखुर्ची ठेवू तिथे. बसेल न तिथे त्या जागेत ?
अर्णव : हो. मग पैसे देऊन टाकू ना त्यांना ?
अश्लेषा : हो.
अर्णव : चालेल देतो उद्या. बर मला सांग काय बनवू तुला खायला ?
अश्लेषा : मला ना मिरचीची भजी खाऊ वाटतेय.
अर्णव : बर थांब. मी खालून लादीपाव घेऊन आलो. आणि लगेच बनवतो. ओके ?
अश्लेषा : हा. लवकर बनव…
अर्णव तिच्या ड्रेसची घडी घालून खाली दुकानात जातो.
भाग ०४
अर्णव लादीपाव घेऊन आला. आत जाऊन भजीसाठी पीठ बनवून मिरची त्यात बुडवून भजी तळताना अश्लेषा आत आली, आणि खुर्चीवर बसली.
अर्णव : अग, मळमळ करेल तुला वासाने
.अश्लेषा : नाही या वासाने उलट भूक वाढलीय.
अर्णव : हा पहिला घाना झालाय. थांब हा.त्याने तिला भजी एका ताटलीत देऊ केल्या. पावासोबत भजी खात ती तिथेच अर्णवला बघत होती. अर्णवने अजून भजी दिल्या पण दोनच घेऊन तिने बाकीच्या भज्यांना नकार दिला. त्या अर्णव तिच्यासोबत खात बसला.
अर्णव : झाल्यात न चांगल्या ?
अश्लेषा : खूप मस्त. अशाच हव्या होत्या मला.
अर्णव : तुला जे जे खाऊ वाटेल ते मला सांग. सगळ करून देईन तुला.
अश्लेषा : हो. आपल घर कधी होईल रे ?
अर्णव : हे एक एवढ वर्ष तुला बोललो न मी, बाळ आपल नवीनच घरात वाढेल. काही दिवस फक्त आपण त्या नवीन रूम्स घेतल्या तिथे राहू मग मी लोन काढून आणि सातारची जमीन विकून तिथं घर घेईन. थोडा वेळ दे मला फक्त.
अश्लेषा : हो दिला. आय लव्ह यु.
अर्णव : आय लव्ह यु टू.
अश्लेषा : आपण उद्या जाऊ पैसे द्यायला भाड्याचे. मला ती बाल्कनी आवडली. तिथे बसेन मी. आपण दोघ बसू चालेल ?
अर्णव : हो. चालेल उद्या जाऊ सोबत.दोघांनी भजी खाल्ली. अर्णव तिला घेऊन बेडरूममध्ये जाऊन झोपवतो. आणि स्वतः आत जाऊन भांडी घासत बसतो.संध्याकाळी….. रस्त्यावरून चालत असताना…..: तुझ लग्न झाल तर तू इथेच असणार आहेस, माझ तस नाही. मी कुठ असेन मला माहित नाही. आणि मला माहित पडल तरी तुला ते कळवण मला जमणार नाही. भीती, जबाबदारी, बंधन सगळ लादल जाईल माझ्यावर. अशात माझा संसार आणि माझ प्रेम यात मला संसार सांभाळावा लागेल. तेव्हा उशीर झालेला असेल. आणि एक सांगू शब्दांचा खेळ म्हण किंवा वस्तुस्थिती म्हणून बघ. उशीर हा कायम वेळेत होतो. आणि वेळ कायम उशिरा येते. तेव्हा वेळ गेल्यावर काहीच होऊ शकणार नाही. जे काही आत्ता सगळ करू शकतो आपण. आपण आपल प्रेम व्यक्त नाही सिध्द करू शकतो. लग्न करून. नववीपासून तूझ माझ प्रेम आहे.
: पहिल प्रेम.: पहिलं प्रेम कधी मिळत नाही म्हणतात. इतके वर्ष होऊन पण आपण सोबत आहे. हि सोबत कायम टिकवायची आहे मला. पहिल प्रेम मिळत नाही आपण मिळवून दाखवायचं.
: माझ हि हेच स्वप्न आहे. मला केल तर तुझ्याशीच लग्न करायचं आहे. पण आत्ताच बघितल न माझ्या बहीणीन कसा उद्योग केला. तिने पळून जाऊन लग्न केल. त्या धक्क्यात आहे अजून आई. एकतर बाबा नाहीत त्यामुळे आईला त्रास होऊ नये कसलाच म्हणून मी काळजी घेत असतो. कारण तिच्या वयाच दुःख ती माझ्या वयाच्या मुलाशी बोलून व्यक्त नाही करू शकत. तिच्या वयाचा जोडीदार जे करू शकतो ते मी नाही करू शकत तिच्यासाठी. मी फक्त तिला सुख आनंद देऊ शकतो आणि त्याचेच प्रयत्न सुरु असतात माझे. पण नेमक दीदीने अस केल. आणि मी हि असच केल आणि आईला काय झाल तर मला नाही सहन होणार
.: पण मी पळून जाऊ अस म्हणतच नाहीये.: मग ? घरी सांगून करायचं का ? नाही होणार… जात एक असली तरी आपली परिस्थिती सारखी नाहीये. आणि मुळात मलाच अस वाटत कि, जी तू आहेस, जशी तू आहेस त्याहून जास्त किंवा तसच अगदी तुझा मी सांभाळ करावा नवरा म्हणून. आत्तापेक्षा कमी तुझ्यासाठी करून तुला त्रासात नाही ठेवायचं मला. आणि तसे दिवस आणायला मला थोडा वेळ लागेल पण करेन नक्की. माझ घर. दोनचाकी, चारचाकी आणि पुरेसे साठवलेले पैसे सगळ मी मिळवेन आणि जास्त उशिरापण नाही. पण मिळवेन.
: माझ्याकडे वेळ नाही.: आणि मला वेळ हवाय.
: कस शक्य आहे ? तू मुलगा आहेस तुला वयाच बंधन नाही. मला आहे.
: स्थळ आली तर नकार दे. दोन वर्ष तरी.
: मी देईन पण पुढून होकार आला तर ?: मला काही सुचत नाहीये.
: मी तुला सुचवतेय तर ते तुला नकोय.
: बर तुला वाटत आपण तस करू.
: काय ? घरी सांगायचं ??
: हो.
: मी जाते.
: कुठ ?
: घरी जाऊन सांगते.
: लगेच ?
: हो.आणि ती निघून गेली.
( पुढील भाग रोज पोस्ट होत राहतील कृपया आपली प्रतिक्रिया कमेन्ट करा, रेटिंग द्या आणि रोज इथेच भेट द्या)

Leave a Reply