एक आयुष्य असत त्यात अनेक गोष्टींचा वावर कायम अगदी अखेरपर्यंत राहतो. काय घडत नाही या आयुष्यात ? खूप काही घडत ज्याचा कुणाला काही फरक पडत नाही. जो जगत असतो, भोगत असतो, सोसत असतो तोच जाणतो या आयुष्याची किंमत. पण, त्या आयुष्याला जगण्याचा विचार सोडून देण्याच्या विचारात कित्येक तरी असतात. आणि जेव्हा हाच विचार, आयुष्य आपल्या बाबतीत करायला लागतो माणूस मृत्यू नावाच्या नव्या गोष्टीला घाबरून आयुष्य नावाच्या गोष्टीशी इतकी लगत करायला जातो की मग त्यात त्या माणसाच जगण मात्र राहूनच जात.
काय असत आयुष्य अस ? एक जन्म मग ठरलेल्या घटना ज्याला आपण नशीब म्हणतो. त्या नाशिबाशी मिळती जुळती घटत जाणारी आपल्या हातून कृती आणि त्या कृतीची परतफेड म्हणून मिळालेला सध्याचा चांगला किंवा वाईट क्षण ज्याला आपण चांगल नशीब किंवा नशिबाचे भोग म्हणतो. मग त्या नशिबाने मांडून ठेवलेले पुढचे सगळे चक्र नकळत आपणच आपल्या कृतीने फिरवत राहतो आणि मग येऊन पोचतो एक अशा ठिकाणी जिथे ना नाती मदतीला येतात, ना जवळचे, ओळखीचे ओळख देतात ना देव साथ देतो. नशिबाने आखलेला वेळेचा वर्तुळ अदृश्य असून देखील आपण नशिबाला कोसत त्या वर्तुळाच्या परिक्रमा काढत राहतो.
पुढे मग कित्येक पाऊलखुणांनी तेच वर्तुळ पुसल जात. पुन्हा बरे दिवस यायला लागतात. आलेल्या दिवसात आपण इतके गुरफटून जातो की वर्तुळावर फिरलेल्या, झिजलेल्या पायाची सालटी आपण पुन्हा खाली वाकून बघत नाहीच. मग त्याच पायांना नवं कातड यायला लागत. हाताला पैसा मोजून मळ यायचा बंद होतो. विचार सगळे डोक्याआड होऊन जातात. नाती सगळी घट्ट होतात. जवळचे, ओळखीचे सगळे आपले होऊन जातात. देवळात न जाता मनात फक्त बोलून दाखवल तरी देव ती इच्छा पूर्ण करायला लागतो. आयुष्य म्हणजे काय अवघड आहे का ? अस बोलून आपण सहजच मागचे दिवस विसरून जातो.
माणूस म्हंटल की अहंकार आला. माणूस म्हंटल की हाव, इच्छा,लोभ या गोष्टीही आल्याच. तिन्ही शब्दांचा अर्थ एक असला तरी तो वेगवेगळ्या गोष्टींसाठी वेगवेगळ्या ठिकाणी वापरला जातो. माणूस म्हंटल की त्याचा जन्म आला आणि त्याला मृत्यू ही येणार. जन्मावेळी समज नसते त्यामुळे स्वतःच्या जन्माच कौतुक सहसा कुणाला नसत. समज असते तेव्हा मृत्यूला हुलवणारे स्वतःला यमराज समजत असतात.
घडणारं घडत जात. बिघडणार कोणी रोखू शकत नाही. समजवणारे अनेक असतात पण ऐकायला उसंत मिळत नाही. स्वतःकडून शिकायला अख्ख आयुष्य कमी असत पण दुसऱ्याला शिकवायला वेळ भरपूर असतो. रडायला समोर लोकं हवेत पण कुणाला आधार द्यायला स्वतःचे खांदे कुणाच्या मिठीत ठेवून बिनधास्त आहेत. सुखाची अपेक्षा आहे पण चांगल्या दिवसाची प्रतीक्षा नको आहे. जगातल सगळ हव आहे पण स्वतःजवळच काहीच कुणाला द्यायला नको वाटतय. देवाची पूजा केली जाते पण श्रद्धा करायला तेव्हडा वेळ नाहीये. चांगल्या दिवसात देवाला दक्षिणा भीक म्हणून दिली जाते पण वाईट काळात त्याच देवाला भीक मागताना लाज वाटत नाहीये. जन्म द्यायला आई वडील हवेत पण जबाबदारी त्यांची नकोय. माणसाला सगळ्या चांगल्या कामाची इच्छा असते पण कौतुक मात्र अजिबात नाही. आणि जे चांगल अजिबात नाहीये ते मिळवण्याची जिद्द प्रत्येक माणसाला उपजत मिळालेली आहे. आयुष्य हेच आहे.
प्रत्येक माणसाच आयुष्य नीट निरखून बघा. प्रत्येकाच्या आयुष्यात एकसारख्या घटना (दुःख) आहेत. त्या घटनांचा स्तर, त्या आजूबाजूची माणसे, परिस्थिति, नावे, ठिकाण इत्यादि वेगवेगळे असतात पण फिरून सगळ सारखच. आणि मग अलीकडे मला सुचल की, आठशे करोंड लोकांकडे काही निवडक देव लक्ष कस बर देत असतील ?
देवाने किंवा निसर्गाने नशीब नावाचे चक्र प्रत्येक माणसाला समप्रमाणात दिलेले आहेत. त्या चक्रासोबत माणूस आयुष्याचा प्रवास करत राहतो. कर्म देखील ठरलेली असतात त्या कर्मला आपण आपल्या पद्धतीने करत गेलो तर काही संदेश देवाकरवी मिळत राहतात. आपण चुकत असल्याचा भास कधी तुम्हाला जाणवला आहे ? हा तोच संदेश असतो. त्याकडे जो दुर्लक्ष करतो तो स्वतःच स्वतःच्या नशीब नावाच्या चक्राखाली येतो. जो असे संदेश बघून स्वतःत बदल करतो त्याच नशीब चांगल होत अस नाही. त्याला ही प्रत्येक वेळी संदेश मिळतात अस नाही. अस जर झाल तर ती व्यक्ती निसर्गनियमाच्या विरुद्ध जगणार नाही का ? म्हणूनच असे चांगले लोक ही पुढे स्वतःच्या आयुष्यात चूका करून बसतात आणि मग इथल एक आयुष्य जगणारा सजीव, माणूस म्हणून मृत्यूशी गळाभेट घेऊन टाकतोच…!

Leave a Reply