रायथॉलिक

देवदासी

·

·

5
(1)

देवळात भरलेल्या लोकांच्या गर्दीत भरतनाट्यमचे संगीत त्याला साथ मिळणारी लोकांची तोंडी वाह-वाही आणि मांडीवर थाप पडत जाणारे त्यांचे हात आणि या निःशब्द कौतुकाला पायाच्या जोराने जमिनीवर दबाव टाकत धरतीशी केलेला संवाद असे हे भरतनाट्यम नृत्य बघण्यासाठी गर्दी रोज जमत नाही. गावातील प्रतिष्ठित लोकांना जेव्हा काही रोजच्या आयुष्यात अडचण येते तेव्हा गावची ग्रामदैवत असलेल्या देवीच्या देवळात हा सभारंभ भवरण्याची रीत फार जुनी आहे. आयुष्यात असलेल्या अडचणींचा उगम त्यामागची कारणे, त्याला मिटवण्याची मार्गे इथेच सुटतात.

देवदासी म्हणजे देवीच्या नावाने सोडलेल्या कोवळ्या वयाच्या मुली. वयात आलेल्या किंवा जन्माला आल्यापासूनच देवीला तिच्यासाठी म्हणून सोडून दिलेल्या या मुली आपले आई,बाप, घरदार सगळ काही यल्लम्माला समजून तिच्याच देवळात वास्तव्य करत असतात. कपाळावर देवीच कुंकू लावून अंगाला चापून-चोपून ओढलेली साडी, अंगावर कवडीच्या माळेचा दागिना आणि मागचे सगळी दुखरी भूतकाळाची आठवण मनाशी धरून देवीपुढे नृत्य करत जमलेल्या गर्दीतला एक-एक माणूस प्रत्येकी मनातून, नजरेतून आणि कानातून वगळत ती एक प्रवास करते देवीपर्यंत जाण्याचा आणि मग कुणीतरी तिच्या जवळ येत मागून तिचे केस मोकळे करतो आणि तिच्यात आयत देवीच वारं येत आणि ती मग त्या गावच्या प्रतिष्ठित व्यक्तीच्या प्रश्नांची उत्तर द्यायला लागते. ती मुलगी जिला तिच्या शुद्ध अवस्थेत कोणी विचारत नाही. तीची विचारपूस करत नाही. जिला कोणी चार पैसे उसने देत नाही का कोणी काम देत नाही.

अशा मुलीकडून ही लोक भूत-भविष्याच्या बाता बोलवून घेतात. सुरुवातीला सुरू असलेले प्रश्न नंतर मग खासगी होत जातात. देवळातले लोक मग हा-हा म्हणता बाहेर पडतात आणि आपापल्या मार्गी निघून जातात. जाता-जाता त्याच वंचित मुलीच्या पाया पडतात, जवळचा पैसा नाही पण एखादा प्रश्न देतात. ती त्याचे उत्तर देते. ती थकेलेली असते पण तिच्यातल वार संपत नाही. सगळ्यांचे प्रश्न सोडवून जेव्हा उरलेला तो प्रतिष्ठित व्यक्ती उरतो. त्याला सल्ला देऊन यल्लम्मा वार घेऊन पुनः तिच्या स्थानी जाते.

उरते तिथे शांतता. शांत मंदिरात गच्च भरलेल्या डोक्याची मुलगी आणि तो प्रतिष्ठित माणूस. मग तिच्या पाया पडून तिचा पाहुणचार करायला तो तिला घरी घेऊन जातो. जाताना दोघे चुप्प असतात. घरी गेल्यावर तो तिला चांगल खाऊ-पिऊ घालतो. अंगात वार असताना तिने त्याला दिलेले कुंकू तो घरभर फुंकुन देवीचा वावर घरभर अनुभवतो. मग पुढे तिच्या हातून देवळात असताना घेतलेल कुंकवात भरलेल लिंबू तो देव्हाऱ्यात ठेवतो. देवीला आठवण करून देतो की तिने त्याला या संकटातून ताराव्. आणि मग त्या बाहेर बसलेल्या मुलीला तो विचारतो आता बर वाटतय का ? आणि तिचा नकार ऐकून तो तिला घेऊन आतल्या खोलीत जातो. तिच्यात देवी अजून आहे का नाही हे तपासून तो तिला पैसे देतो.

“मी देवदासी आहे.. तुम्हाला मी नाही आई यल्लम्मा मार्ग देते” अस बोलून ती, दक्षिणा नाकारते आणि मग तो ते पैसे तिच्याच हातावर ठेवतो. आणि दरवाजा बंद करून तीची साडी फेडतो.

देवदासी स्त्री असते किंवा कोणी एक हिजडा. दोघांची आई यल्लम्माच असते आणि अंगावर साडीसुध्दा. देवदासी संप्रदाय अलीकडे देवरुषि आणि शारीरिक धंद्याकडे वळले आहेत. गरज म्हणून नाही तर मजबूरी म्हणून. जी आई इतरांना मार्ग देते ती मात्र स्वतःच्याच लेकरांकडे दुर्लक्ष करून बसलेली असते. सरकारकडे या अशा लोकांची गिनती नाहीच. पण यल्लम्मा, तुळजाभवानी, अंबाबाई, रेणुका अशा महादेवीची लेकरं सगळ आयुष्य तिच्या पायाशी वाहून जगत असताना लोक स्वतःचे भले करून घेऊन त्यांची साडी फेडण्यात हौशी असलेले दिसतात.

आणि भविष्याकडे बघण्याची ताकद असताना देखील हे देवदासी साडी फेडली जाणार असताना आधी काही क्षण मोह मायेच्या मायेने सगळ भविष्य विसरून जात असतात..

देवदासी.. आधी देवीची मग भक्ताची “दासी”.

कथा कशी वाटली ?

Click on a star to rate it!

Average rating 5 / 5. Vote count: 1

No votes so far! Be the first to rate this post.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *